नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या की नाही....?
नवीन वर्ष म्हणजे नेमकं काय...? तर ....जेव्हा.....
जुने पूर्व संपतं आणि नवीन सुरू होतं,
जुना काळ उलटतो आणि नविन सुरू होतो, १२ महिन्यांचा एक कालावधी संपतो आणि त्याच कालावधीचा पुन्हा प्रारंभ होतो नव्या वर्षात....
गेल्या काही वर्षांपासून सामाजिक प्रसारमाध्यमातून म्हणजेच सोशल मीडिया मार्फत काहीजण आपले मत मांडताना दिसतात ते म्हणजे, " मला शुभेच्छा देऊ नका कारण माझें नवीन वर्ष ३१ डिसेंबरला होत नाही".... खरंतर बरोबरच आहे कारण हिंदू धर्मानुसार नवे पर्व हे चैत्रातच सुरू होते....परंतु तरीही त्यांचं बरोबर असून देखील मला मात्र काही गोष्टी खटकतात त्या मांडण्याचा प्रयत्न करते आहे.
अनेक उदाहरण देता येतील नवीन वर्षाची व्याख्या सांगताना...... मी एक हिंदू धर्म संस्कृती मध्ये जन्म घेतलेली व्यक्ती..... माझ्या संस्कृती नुसार नवे पर्व हे चैत्र शुक्ल प्रतिपदेला सुरू होते आणी ह्याच पर्वात निसर्गात नवे बदल घडून येतात...... हिंदू संस्कृतीनुसार सर्व सण हे पंचांगात दर्शविल्याप्रमाणे साजरे केले जातात....आता थोडं तिथीनुसार आपले मोठे सण जाणून घेऊ...
चैत्र - गुडीपाडवा (नवीन पर्वाचा आरंभ), रामनवमी, हनुमान जयंती,
वैशाख - अक्षय्य तृतीया
ज्येष्ठ - वटपौर्णिमा
आषाढ - देवशयनी आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा
श्रावण - नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला
भाद्रपद - हरितालीका, श्री गणेश चतुर्थी,
आश्विन - घटस्थापना, दसरा, कोजागिरी पौर्णिमा, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन
कार्तिक - बलिप्रतिपदा, कार्तिकी एकादशी
मार्गशीर्ष - दत्त जयंती
पौष - मकरसंक्रांती, पौष पौर्णिमा
माघ - श्री गणेश जयंती, महाशिवरात्री
फाल्गुन - होळी,धुलीवंदन
तर हे सर्व सण आनंदाने, उत्साहात, जल्लोषात साजरे केले जातात.
हे आहेत हिंदू धर्मातील तिथीनुसार सण. आजही कुठलाही समारंभ असू द्या पंचांग बघणारी परंपरा आपली मग ३१ डिसेंबर साजरा केला म्हणून आपली संस्कृती अशी कशी लोप पावेल.....
आता लक्ष देऊया इंग्रजी दिनदर्शिकेकडे.....
जानेवारी ते डिसेंबर १२ महिन्यांचा कालावधी जी ब्रिटिश राजवटीने आमलात आणि सर्वांनी ती आचरणात आणली. ब्रिटिशांनी जी आकडेमोड केली ते जरी माहीत नसते तरी पंचांगात सौरमंडलाप्रमाणे तिथी बघितली जाते हे सर्वांना ज्ञात आहे.
प्रत्येक देशात सौरमंडलाप्रमाणे तिथी बदलत असते. काही ठिकाणी सूर्य दर्शन महिनोंमहिने होत नाही मग त्यांनी तिथी कशी समजावी....हाच विचार कदाचित लक्षात घेऊन जागतिक दिनदर्शिकेची निर्मिती झाली असावी असे मला वाटते. म्हणजे सगळ्या देशांचे व्यवहार एकसारखे करता येतील.
आता मूळ मुद्यावर येते, ते म्हणजे ३१ डिसेंबर साजरा करावा की नाही.....
आपल्या दैनंदिन जीवनात प्रत्येक कार्य हे तारीख लक्षात ठेवून केले जातात. घड्याळात देखील रात्री १२ नंतर दुसरा दिवस सुरू होतो, कार्यालयीन व्यवहार हे देखील दिनदर्शिका बघूनच केले जातात. कार्यालयात भाषा देखील पाश्चिमात्य असते. सरकारी कागदपत्रात देखील दोन्ही भाषेत व्यवहार नोंद होतात.
१. आर्थिक वर्षाचा शेवट हा एक तर ३१ डिसेंबर असतो किंवा ३१ मार्च असतो.
२. जन्माची वेळ आणि तारीख दिनदर्शिकेनुसार नोंदवली जाते.
३. शालेय जीवनाची सुरुवात तारखेनुसार होते.
४. मुंज, लग्न, बारसं, (तिथीनुसार असले तरीही) तारीख लक्षात ठेवली जाते.
६.वाढदिवस तारखेनुसार साजरे केले जातात, काही जण तिथीनुसार देखील करतात, म्हणजेच दोन वेळा करतात. (आनंद हा दुप्पट असावा)
७. कोणाला भेटायचं असेल तर पहिल्या प्रहरी, दुसऱ्या प्रहरी असे न म्हणता आपण दिवस आणी वेळ ठरवतो
८. मृत्यू च्या दाखल्यावर देखील वेळ आणि दिनांक नोंदवली जाते.
तात्पर्य काय तर जन्मापासून ते मृत्यु पर्यंत तारखेशिवाय पर्याय नसतो.
प्रत्येक धर्मात सांगितले जाते नाती जोडा, नाती जपा परंतु आपल्या मतांचे ओझे देऊन त्यात दुरावा आणू नका.
सुचवायचे एवढेच आहे की आयुष्यतील प्रत्येक कार्य हे तारखेनुसार पार पाडले जातात. तिथी बघितली जाते परंतु सांगताना तारीख सांगितली जाते.
ह्या ब्रिटिश परंपरेचा विरोध करणार्यांना एकच विचारावेसे वाटते.....तुमची मुलं इंग्रजी बोलू शकत नाही, लिहू शकत नाही तेव्हा तुम्हाला राग येतो किंवा कमीपणा वाटतो, परंतु ती भाषा पण पाश्चिमात्य देशातलीच. मुलं उच्चशिक्षित असावी त्यांचं भविष्य मार्गी लागावं म्हणून मराठी शाळेत न पाठवता त्यांना इंग्रजी शाळेत का पाठवले जाते...? मराठी शाळेत जरी मुलं असतील तरीही त्यांना इंग्रजी शिकवू नका असे सांगणारे कीती पालक आहेत...? शास्त्र, वेद सगळ्यांचे शिक्षण आपल्याला दिले जाते परंतु त्याच प्रमाणे तंत्रज्ञान देखील सतत प्रगत होत राहते....बहिष्कार करायचाच असेल तर प्रत्येक गोष्टीचा करा...... आणि स्वीकारायचं असेल तर प्रत्येक गोष्टीचे आनंदाने स्वागत करा.
आपल्या संस्कृतीचा अभिमान प्रत्येकाला असावा आणि ती संस्कृती जपणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. ती संस्कृती जपावी म्हणून जर जोर जबरदस्ती केली तर तो आपल्या संस्कृतीचा अपमानच नाही का...!केवळ नवीन कालावधीचा स्वीकार करणे म्हणजे धर्मातर करणे असे होत नाही.
माझा एक सर्वांना प्रश्न आहे बाळ कुठेही राहिलं, वाढलं तरीही ते आईला विसरतं का...? किंवा इतर देशांच्या भाषा जरी अवगत केल्या तरीही मायबोली कोणी विसरतं का....?
मग अशा ह्या नवीन कालावधीचे स्वागत केले तर त्यात वावगं काय आहे. येत्या नवीन दिनदर्शिकेचे, १२ महिन्यांचे स्वागत केले तर आपल्या संस्कृतीला धक्का लागेल असा विचार करणाऱ्यांना एकच सांगावेसे वाटते की संस्कृती म्हणजे कोणी व्यक्ती नाही किंवा वस्तू नाही ती एक नाळ आहे जी जोडलेली असते जन्मापासून....
नवीन दिनदर्शिकेच्या हार्दीक शुभेच्छा....
Happy New Financial Year 2022.
©®प्रतिक्षा कांबळे (psb)
३१.१२.२०२१

