Wednesday, 20 July 2016



कुठुन आणु तो गर्भ…

किती जपलंस तु मला
अगदी मी निर्माण होण्या आधी पासुन
जेव्हा मी पूर्णत्वाला देखील नव्हते आले
जपलेस मला अगदी तेव्हापासुन .
केवळ ‘मी’ हे जग बघावे म्हणुन
खुप काळजी घेतलीस गर्भात असताना
प्रसव यातना सहन केल्यास
मला ह्या जगात आणताना.
जेव्हा मला बोलताही येत नव्हते
तेव्हा माझी भाषा तुला कळायची
माझ्या येण्याची चाहुल येताच
तु मागे वळुन बघायची.
मला साधं खरचटलं तरीही
‘ईस’ निघायचं तुझ्या तोंडुन
मला बरं नसताना उशा शी
बसायचीस तुझी झोप मोडुन
आपल्याला जोडलेली नाळ
माझ्या जन्मताच कापली गेली
पण तो तर फक्त अवयव होता
नाळ आजही सोबत राहिली.
आज तु उतारवयात पोहचलीस
मी तुझ्यासाठी मोठी झाले
आणि तु माझ्यासाठी लहान झालीस
काळजात धस्स झालं माझ्या
जेव्हा डॉक्टर म्हणाले
“आईची काळजी घ्यावी लागेल”
तिला आता तुझी साथ लागेल.
मनात विचार आला
मला जपलंस गर्भात नऊ महिने
कुठलाही त्रास होऊ दिला नाहीस
जगात आल्यावर कोसळु दिले नाहीस
मी कुठुन आणु तो गर्भ
जिथे तुला जपुन ठेवता येईल
बाहेरच्या व्याधिपासुन
आई तुला लपवुन ठेवता येईल
सांग ना कुठुन आणु तो गर्भ…..
@ प्रतिक्षा कांबळे (psb)

No comments:

Post a Comment